कोलकाता - जागतिक क्रिकेटमध्ये युनिव्हर्सल बॉस या नावाने प्रसिध्द असलेला ख्रिस गेल आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. कोलकाताविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात हा विक्रम करण्याची त्याला संधी आहे. गेलला आयपीएलमध्ये ३०० षटकार पूर्ण करण्यासाठी ४ षटकारांची गरज आहे. त्याने आतापर्यंत ११३ सामन्यात २९६ षटकार खेचले. आजच्या सामन्यात त्याने आणखी ४ षटकार खेचल्यास तो षटकारांचे त्रिशतक पूर्ण करू शकतो.
गेलनंतर महेंद्र सिंह धोनी १८७ षटकार लगावत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर एबी डिविलियर्सने १८६ षटकार ठोकत तिसऱ्या स्थानी आहे. गेलने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ४७ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यात ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले. नुकतेच त्याने आयपीएलमध्ये कमी डावात वेगाने ४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. विंडीजचा हा स्फोटक फलंदाज आंतरराष्ट्रीय टी-२० आणि जगभरातील सर्व टी-२० लीगमध्ये एकूण ३७२ सामने खेळला असून त्यात त्याने ९११ षटकार खेचले आहेत.