काठमांडू - चीनच्या नेपाळमधील राजदूत होऊ यांकी यांनी आज (गुरुवार) सत्ताधारी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांची भेट घेतली. पंतप्रधान के. पी ओली आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्षप्रचंड यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.
भारतविरोधी भडकाऊ वक्तव्य केल्यामुळे पंतप्रधान के. पी ओली अडचणीत आले आहेत. ओलींनी केलेली विधाने राजकीयदृष्या आणि राजनैतिकदृष्या बरोबर नव्हती, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह प्रचंड यांचे मत आहे.
राजदूत होऊ या सकाळी 9 वाजता प्रचंड यांच्या निवासस्थानी पोहचल्या. दोघांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याशिवाय होऊ यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी आणि इतर पक्षाच्या नेत्यांशीही नंतर चर्चा केली.
नेपाळमधील सत्ताधारी नॅशनल कम्युनिस्ट पार्टीला दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी करण्यात अपयश आले आहे. यासंबंधी अनेक बैठका झाल्या मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडून आली नाही. बुधवारी पक्षाच्या 45 महत्त्वाच्या सदस्यांची बैठक शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आत्तापर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, पंतप्रधान के. पी ओली आणि प्रचंड यांच्यातील मदभेद दुर झालेले नाही.