नांदेड - कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज मध्यरात्रीपासून ते 20 जुलैदरम्यान संचारबंदीच्या काढलेल्या आदेशात आज सकाळी काही फेरबदल केले आहेत. पूर्वीच्या आदेशात सूट देण्यात आल्याच्या वेळांमध्ये बदल केले आहेत.
शुक्रवारी (10 जुलै) काढलेल्या आदेशात भाजीपाला, फळ विक्री, दुध, शुद्ध पाणी पुरवठाधारक एका ठिकाणी न थांबता गल्लीबोळात फिरून विक्री करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 2पर्यंत मुभा देण्यात आली होती. त्यात आता बदल करून सकाळी 7 ते 10 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर बँकांमध्ये शासकीय व बँकेच्या स्वतः च्या कामाव्यतिरिक्त ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
शिवाय, मान्सून संबंधित कामे करण्यासाठी पूर्वीच्या आदेशातील अटी, शर्ती कायम ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर खाजगी, 3 चाकी, 4 चाकी व इतर वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक वैद्यकीय कारणांसाठी तसेच परवानगी प्राप्त असलेल्या राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासाच्या वाहतुकीस या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार नागरिकांच्या हालचालींवर कडक प्रतिबंध प्रशासनाने लादले आहेत.