बुलडाणा - बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी उद्या (१८ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून १० हजार ४८ अधिकारी कर्मचाऱयांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या कर्मचाऱयांना दोनदा प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बुलडाणा लोकसभा मतदार संघात यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ हजार २८१ मतदान केंद्रावरुन ११ तास चालणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी १० हजार ४८ अधिकारी, कर्मचाऱयांवर आहे. मेहकरात सर्वाधिक १ हजार ५३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱयांना दोनदा मतदान प्रक्रियेविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतदानासाठी लागणाऱया साहित्यांचे विधानसभानिहाय वाटप करण्यात आले आहे. प्रशासनाने याची तयारी पूर्ण केली आहे. पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत. आज सायंकाळपर्यंत कर्मचारी, अधिकार ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रावर पोहोचणार आहे.
मतदारसंघनिहाय नियुक्त कर्मचारी पुढीलप्रमाणे -
मलकापूर : १३३२, बुलडाणा :१४७६, चिखली : १४०४, सिंदखेड राजा :१५०८, खामगाव : १३९२ व जळगाव जामोद : १४००.( नियुक्त कर्मचा-यांमध्ये १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी आणि १ सहाय्यकाचा समावेश आहे.
कर्मचारी, मतदान साहित्य वाहतुकीसाठी ६९६ वाहनांची गरज आहे. यामध्ये २५८ एसटी बस, ४२४ जीप, १४ कंटेनर, ४६ स्कूल बसचा वापर होणार आहे.
- मतदान केंद्र (जिल्हा): २२८१
- केंद्र (बुलडाणा मतदारसंघ) : १९७९
- नियुक्त कर्मचारी : १००४८
- वाहने (किमान) : ६९६