कराची - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातल्या तुरबात शहरात बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 1 जण ठार झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. शहरातील बाजारात वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. अनेक वाहनांचेही स्फोटामुळे नुकसान झाले.
एका दुकानाबाहेर दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. स्फोट झाला त्यावेळी बाजारात गर्दी होती. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामध्ये कोणाला लक्ष करायचे होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कराची शेअर मार्केटवरील हल्ला -
मागील काही दिवसांपूर्वी दोन बंदुकधारी दहशतवाद्यांनी कराची शेअर मार्केटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एका पोलिसासह दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. मात्र, हा हल्ला उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश आले होेते. शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. बलुचिस्तानातील बंडखोर गटांनी हा स्फोट घडवून आणला होता.