अमरावती - नागपूर मार्गावर अमरावतीमध्ये सर्वात मोठे कापड मार्केट असणाऱ्या बिझिलँड येथील सर्व दुकाने उघडण्यात यावी, यासाठी भाजपने आंदोलन केले. यावेळी व्यपारी आणि कामगारांवर हा अन्याय असून राज्य शासनाने कुठलीही माहिती न घेता लॉकडाऊनच्या नावाखाली अमरावतीकरांना वेठीस धरल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यानी केला.
बिझीलँड मार्केटमध्ये सकाळपासूनच तणाव
आजपासून मार्केट सुरू करा, असे आवाहन भाजपने केले. त्यामुळे आज सकाळपासून बिझीलँडमध्ये व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्यासाठी गर्दी केली होती. भाजप कार्यकर्ते बिझीलँड येथे धडकण्याची माहिती आधीच मिळाली. त्यामुळे बिझीलँड परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
दुपारी 12 वाजता भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रणित सोनी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते बिझिलँड येथे पोचले. दरम्यान पोलिसांनी व्यपाऱ्यांवर लाठीचार्ज केला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. तर, आम्ही कुठेही लाठीचार्ज केलेला नाही, असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आले.
भाजप कार्येकर्ते पोलिसांच्या ताब्यात
बिझिलँडच्या मुख्य प्रवेशद्वारासमोट ठाण मांडून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज्य शासनाविरोधात घोषणा देत होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर भाजपचे आंदोलन शांत झाले.
बिझीलँडमध्ये ग्राहकांची गर्दी
बिझीलँड येथे स्वस्तात उत्तम दर्जाचे कपडे मिळतात. लग्नाचा बस्ताही मिळण्याचे हे महत्वाचे ठिकाण आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यसाह लगतच्या अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून ग्राहक या मार्केटमध्ये येत असतात. सध्या लग्न सरायची धामधूम सुरू आहे. त्यामुळे लग्नाचा बस्ता खरेदी करण्यास ग्राहक बिझीलँडमध्ये येत आहेत. शासन आदेशानुसार मार्केट बंद दिसत असले, तरी ग्राहकांना दुकानात नेल्यावर दुकानाच्या शटरला बाहेरून कुलूप लावले जात आहे.