नागपूर- लॉकडाऊनच्या काळात जनसामान्याला अवाचेसव्वा वीज बील पाठवल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आज भारतीय जनता पक्षाकडून 'जन आंदोलन' करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबादच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. आमदार गिरिष व्यास यांच्या नेतृत्वात अयाचित मंदिर चौकात हे आंदोलन करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना महाराष्ट्र सरकारकडून वीजेचे बील अधिक पाठवल्याने यावर आक्षेप घेत हे वीज बील माफ करून जनतेचे शोषन थांबवावे अशा घोषणा देत भाजपकडून 'जन आंदोलन' करण्यात आले. नागपुरातील विविध चौकात हे आंदोलन करण्यात आले. याचबरोबर ऊर्जा मंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेचे शोषण करू नये अशी विनंतीही आंदोलनाच्या माध्यमातून केली.
जनसामान्यांना लॉकडाऊनच्या काळात आधीच आर्थिक अडचण असताना अशात वाढीव वीज बील कसे भरणार ? असा सवालही यावेळी भाजपा आमदार गिरिष व्यास यांनी उपस्थिती केला. त्यामुळे या विजबिलांवर महाराष्ट्र सरकारने विशेषतः ऊर्जामंत्र्यांनी तात्काळ लक्ष देऊन ते रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही प्रकारचे मिटर रिडिंग न घेता अंदाजे हे वीजबिल पाठविण्यात आले. यासाठी सरकारला विनंती आहे की हे वीज बील 2019 च्या आधारवर असावे, अशी मागणी देखील यावेळी आमदार गिरिष व्यास यांनी केली. प्रत्येक महिण्याचे बील वेगवेगळे करा, त्याचे एकत्रीकरण करून जनतेची दिशाभूल करू नका असे खडे बोलही यावेळी व्यास यांनी सुनावले. त्याचबरोबर, उर्जामंत्र्यांनी सुधारित बिल पाठवावे, तसेच या जन आंदोलनात सर्व सामान्य जनतेने देखील सहभाग घेऊन वीज बील भरू न भरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र सरकार जनतेचे शोषण करत असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, वीजबिल कमी करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.