मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर काल(मंगळवारी) अज्ञातांनी तोडफोड केली. या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना आज न पकडल्यास उद्या माटुंगा पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशारा भीम आर्मीच्यावतीने देण्यात आला आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. यानंतर आता राज्यातील अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तर, भीम आर्मीने या प्रकरणातील आरोपींना तत्काळ न पकडल्यास उद्या माटुंगा पोलीस ठाण्याला घेराव करण्याचा इशारा दिला आहे.
ही वास्तू आपली अस्मिता असून सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्या वास्तूवर काल संध्याकाळी भ्याड हल्ला करण्यात आला, काचा फोडण्यात आल्या. एवढी महत्त्वाची वास्तू असतानादेखील बाबासाहेबांच्या घराला पोलीस संरक्षण नव्हते. महिनाभरात राज्यात दलित अत्याचाराच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत. हे सर्व निंदनीय आहे. कोरोना आहे समजू शकतो. आपल्याला कायद्याचे पालन करायचे आहे. मात्र, सरकारला जागे करण्यासाठी या गोष्टीचा निषेध करणे महत्त्वाचे आहे. आज मुंबई पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास उद्या दुपारी 3 वाजता माटुंगा पोलीस ठाणे येथे आम्ही घेराव करणार आहोत. हा संपूर्ण घेराव संविधानिक पद्धतीने असणार आहे, असे भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले.