भंडारा - देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. लॉकडाऊनच्याकाळात काहींनी शासनाच्या तर काहींनी सामाजिक संस्थेमार्फत मिळणारी मदत पदरात पाडून घेतली. तर काहींनी कोरोनामुळे काम बंद झाले, असे म्हणत घरीच राहणे पसंद केले. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधून कुटुंबाचा गाडा चालविण्याचे काम एका महिलेने केले आहे. त्यांनी लॉकडाऊनमध्ये इतरांच्या दारात रांगेत उभे न राहता स्वतः व्यवसाय करत आपल्या समोर ग्राहकांच्या रांगा लावून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
माजी पंचायत समिती सदस्या पुष्पा भुरे या लॉकडाऊन होण्याअगोदर खानावळीचा व्यवसाय चालवीत होत्या. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपयांचा नफा होत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. खानावळ बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा खर्च अशा अनेक समस्या पुष्पा भुरे यांच्यासमोर उभ्या होत्या. पण त्या या परिस्थितीतही हरल्या नाही. संकटावर मात करण्यासाठी त्यांची धडपड नेहमीची. याही संकटात त्यांनी आपला जगण्याचा मार्ग शोधला. खानावळ बंद झाल्यावर त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला. दोन महिन्यांपासून त्या भर उन्हात भाजीपाला विकून प्रपंच चालवत आहेत.
या व्यवसायात त्यांचा मुलगा रोशनही त्यांची मदत करत आहे. पुष्पा भुरे या 30 वर्षांपूर्वी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. मात्र, कालांतराने त्यांनी खानावळ सुरू केली आणि त्यात त्यांना चांगला नफा मिळू लागला. मात्र, लॉकडाऊनमुळे ही खानावळ बंद झाली. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर बसून आणि दर दिवशी वेगळ्या गावात जाऊन भाजी विक्रीचा काम त्यांनी सुरू केले. माजी पंचायत समितीची सदस्य असल्याने समाजात त्यांचा एक आदर होता. तसेच खानावळ सुरू केल्यापासून आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. मात्र, या सर्व गोष्टी दूर ठेवत स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी त्यांनी रस्त्यावर बसून भाजी विक्रीचे काम सुरू केले.
या व्यवसायातून त्यांना खानावळ चालविण्याइतके पैसे मिळत नसले तरी स्वाभिमानाने जगण्याइतके पैसे तर नक्कीच मिळत आहेत. प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आत्मनिर्भर बनून मदतीसाठी रांगा न लावता स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांच्या रांगा आपल्या दुकानासमोर उभ्या केल्या. सध्या त्या भाजीपाला आणि फळे विक्री करून स्वतःच्या कुटुंबाचा गाडा रेटत आहेत. त्यांच्या या जिद्दीला सलाम.