बंगळुरू - आयपीएलच्या ५४ व्या सामन्यात आज बंगळुरूने हैदराबादचा ४ गडी राखून पराभव केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरूपुढे धावांचे १७६ लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात बंगळुरूने हे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शिमरोन हेटमेयर ७५ तर गुरकिरत सिंग मान ६५ यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर हैदराबादने दिलेले आव्हान बंगळुरूने सहज पार केले.
१७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या बंगळुरूची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने केवळ १६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर हेटमेयर आणि गुरकिरत यांनी बंगळुरूचा डाव सांभळला. दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
शिमरोन हेटमेयर याने ४७ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. त्यात ६ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. गुरकिरत मान सिंह याने ४८ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६५ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार २, खलील अहमद ३ गडी बाद केले तर राशिद खानला एकमेव गडी बाद करता आला.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केन विलियमनसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित २० षटकात ७ बाद १७५ धावापर्यंत मजल मारली. हैदराबादकडून ऋध्दिमान साहा २०, मार्टिन गुप्टिल ३० आणि विजय शंकर २७ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार केन विलियमसनने ४३ चेंडूत ७० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यात ५ चौकार आणि ४ षटकरांचा समावेश आहे.
बंगळुरूकडून वॉशिग्टन सुंदरने २४ धावात ३ गडी तर नवदीप सैनीने ३९ धावात २ गडी बाद केले. युझवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. उमेश यादवने शेवटच्या षटकात २८ धावा दिल्या. त्यामुळे हैदराबाद १७५ धावांपर्यंत मजल मारता आली.