नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही आता 10 हजाराच्या घरात गेल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यात कोरोना टेस्ट वाढवल्या तसेच जे नागरिक कोरोनाबाधित आहेत ते समोर आले तर, इतरांचा धोका कमी होण्यास मदत होईल असा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे आता शहरात उद्यापासून अँटीजेन चाचणी केल्या जाणार आहेत. दररोज 1 हजार चाचण्या होणार असल्याने आता रुग्णसंख्या ही झपाट्याने समोर येईल. असा आरोग्य विभागाचा दावा आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनाचा धोका कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने 21 जुलैपासून शहरात रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्याचे ठरवले आहे. या टेस्टचा रिपोर्ट हा अवघ्या अर्धा तासात प्राप्त होणार असल्याने जास्तीत जास्त रुग्णांची टेस्ट होण्यास मदत होईल. सध्याच्या घडीला अँटीजेन टेस्टच्या 10 हजार किट आरोग्य विभागाकडे आहेत. तर 15 हजार किट्सची मागणी करण्यात आली आहे. म्हणजे जवळजवळ 25 हजार टेस्ट करण्याचा विचार आरोग्य विभागाचा आहे. तसेच यापुढे शहरातील ज्या इमारतींमध्ये एक किंवा दोन रुग्ण बाधित आढळून आले आहेत. अशा ठिकाणाची, प्रतिबंधित क्षेत्राची जबाबदारी ही प्रशासनाने त्या इमारतीच्या मालकांवर टाकली आहे. सध्या 250 इमारती या शहरात आहेत. त्या ठिकाणी 1 ते 2 रुग्ण आहेत. त्यामुळे मालक किंवा हे सचिव असतील त्यांनीच आपल्या रहिवाशांची काळजी घेणं गरजेचं आहे, असेही त्यांनी म्हटले.