मुंबई - येथील मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटने मुंबईतील वरळी परिसरामध्ये कारवाई केली. या कारवाईदरम्यान शिवकुमार शंकर बसय्या (40) या अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल 40 किलो वजनाचे गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या या 40 किलो गांजाची किंमत 8 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील वरळी परिसरातील वरळी दूध डेअरी, कामगार बस स्टॉप जवळील फूटपाथवर पोलिसांनी सापळा रचला होता. याठिकाणी अटक आरोपी शिवकुमार शंकर बसैया हा पोलिसांना आढळून आला. या आरोपीस ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून पोलिसांना 40 किलो गांजा हे अमली पदार्थ मिळून आलेले आहे.
या आरोपीच्या आतापर्यंत केलेल्या चौकशीमध्ये वरळी व आजूबाजूच्या परिसरामध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी मोठी टोळी सध्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीचा ही सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे.