अमरावती/कोल्हापूर/सांगली - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. महापुरामुळे पूरग्रस्त भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुरासोबत वाहून आलेला कचरा आणि मातीचे ठीक-ठिकाणी ढिगारे जमले आहेत. हे ढिगारे उचलण्याचे काम सामाजिक कारकर्त्यांकडून केले जात आहे. त्या सामाजिक कार्यात गाडगेबाबांची भूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील तरुणांनीदेखील सहभाग नोंदवला आहे.
संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. त्या गाडगेबाबांचा जिल्हा असलेल्या अमरावतीतील काही तरुण गेल्या ६ दिवसांपासून सांगलीच्या ब्रम्हनाळ गावात स्वच्छतेचे कार्य करत आहेत. स्वच्छता करणाऱ्या तरुणांमध्ये पूर्ण बोरसे, चेतन बोबडे, सनी चौधरी, अर्पित बोरोडे, अक्षय गणोरकर आदींचा समावेश आहे.