अमरावती - खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणा कुटुंबात यापूर्वी दहा जण कोरोनाबधित झाले असून आता खासदार नवनीत राणा यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 672वर पोचली असून कोरोनामुळे जिल्ह्यात 80 जण दगावले आहेत.
राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, जवाई, भाचा, पुतण्या यांना कोरोना झाल्याचे 2 ऑगस्टला स्पष्ट झाले होते. 3 ऑगस्टला खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला होता. गुरुवारी सकाळी खासदार नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असताना त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार नवनीत राणा यांच्यासह घरातील आणखी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले असून आमदार रवी राणा आणि त्यांचे मोठे भाऊ वगळता संपूर्ण कुटुंब कोरोनाबधित झाले आहे.
दरम्यान, आमदार रवी राणा यांच्या आई- वडिलांवर नागपूर येथे उपचार सुरू असून कुटुंबातील इतर सर्व सदस्यांवर अमरावतीतच उपचार सुरू आहेत. अमरावतीत कोरोनाने थैमान घातले असताना जिल्हा प्रशासन कोरोनावर मात करण्यास अपयशी ठरले असून अमरावती शहरात सर्वत्र गर्दी वाढली आहे.