मुंबई - काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार ज्या खेळाडूला चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्कृष्ठ फलंदाज मानयचे, त्याच खेळाडूला बीसीसीआयच्या निवड समितीने विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान दिले नाही. त्या खेळाडूचे नाव अंबाती रायुडू असे आहे. रायडूला बाहेर बसविण्यात निवड समितीचाही काही दोष नाही. यातच आता क्रिकेट समीक्षक हर्षा भोगले यांनी रायडूचे करिअर संपल्यात जमा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबातीची बॅट शांतच होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला छाप पाडता आली नाही. ३३ वर्षीय अंबातीच्या जागी विजय शंकरला पंसती देण्यात आली. अंबाती २००४ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार होता, त्याला संघात स्थान न दिल्याने सारेच जण आश्चर्यचकीत झाले आहेत.
हर्षा भोगले यांच्या मते, अंबाती यापुढे भारतीय संघाचा भाग असणार नाही. मागील विश्वकरंडकाच्या पूर्वी तो प्रत्येक एकदिवसीय सामन्यात खेळला आहे. विश्वकरंडकाच्या निवडलेल्या संघातही तो होता. मात्र, कर्णधार धोनीने त्याला एकाही सामन्यात खेळण्यास संधी दिली नाही. विश्वकरंडकानंतर त्याला पुन्हा संघाबाहेर ठेवण्यात आले.
पुढे बोलताना हर्षा भोगले म्हणाले की, आशिया चषक, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अंबातीला चमकदार कामगिरी करता आली नाही. रणजी क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली आहे. सध्या तो संघाबाहेर आहे. त्यामुळे पुन्हा त्याला भारतीय संघात संधी मिळेल अशी आशा खूपच कमी आहे.