रत्नागिरी - रत्नागिरी शहरासह, ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्या 92 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 20 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नगरिकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करूनही अनेकजण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे आशा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये तसेच सर्व पोलीस ठाण्यांमार्फत ग्रामीण भागात मास्क वापरणे, ठराविक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात आली होती. जे नागरिक मास्क वापरत नसल्याचे आढळले, त्यांना मास्कचे वाटप करून जनजागृती करण्यात आली होती. मात्र, तरीही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर कारवाई करत एकूण तब्बल 20 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.