जळगाव - शहरातील पारख नगरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल उर्फ अनिरुद्ध शांताराम भालेराव (वय, 45) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंदनगर परिसरातील पारख नगरात अनिल भालेराव हे त्यांच्या वडिलांसोबत राहत होते. ते अविवाहित होते. मिळेल ते काम करुन ते आपला उदरनिर्वाह करत होते. अविवाहित असल्याने ते नेहमी चिंतेत असायचे. यातच त्यांना दारूचे व्यसन जडले होते. व्यसनाच्या आहारी गेल्याने ते नैराश्यात होते.
बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांचे वडील घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपलेले होते. तेव्हा अनिल यांनी घराच्या मागच्या दारात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, काही वेळाने अनिल यांचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्याला या घटनेबाबत कळविले. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस कर्मचारी विनोद शिंदे व हरीश डोईफोडे करीत आहे.