सोलापूर- अहोरात्र अभ्यास करून महाराष्ट्र राज्य आयोगाच्या परीक्षा दिल्या. तीनदा पदरी अपयशच मिळाले. तरी देखील त्याच जिद्दी प्रयत्नांच्या जोरावर चौथ्या प्रयत्नात बडेलवाडी येथील शेतकऱ्याची लेक वर्षा नाना कोळेकर ही नायब तहसीलदार झाली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी अपयश पचवण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन वर्षाने तरुणांना केले आहे.
वर्षाची आई तुळसा, वडील नाना हे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करतात. आई वडिलांची कष्टांची जाण ठेवत तसेच मामा आप्पासाहेब लठ्ठे यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या पाठबळाच्या जोरावरच वर्षाला हे यश खेचून आणता आले आहे.
वर्षाने जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात यश मिळवले आहे. राज्यात नायब तहसीलदार पदाच्या रँकमधून वर्षांचा राज्यातून 62 वा रँक आला आहे. वर्षाने पुणे येथून बि.टेक.पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. वर्षाने 3 परीक्षा दिल्या, मात्र त्यात वर्षा अपयशी ठरला होती. अखेर चौथ्या प्रयत्नात वर्षाने यशाला गवसणी घातली आहे. तिच्या यशामुळे तिचे संपूर्ण कुटुंबीय आनंदून गेले आहेत.
यशाबद्दल बोलताना वर्ष म्हणाली, मी दहावीमध्ये शिक्षण सुरू असताना उपळाईच्या रोहिणी भाजीभाकरे आय.ए.एस अधिकारी झाल्या होत्या. त्यांची मुलाखत व भाषण ऐकले होते. तेव्हाच ठरवले होते शासकीय अधिकारी व्हायचे आहे. आई वडिलासह माझ्या मामाचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले. आजच्या तरुणांनी ध्येय निश्चिती करायला हवे.