जळगाव - बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उमेश प्रल्हाद चौधरी (वय 35, रा. साळशिंगी) असे आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. उमेश चौधरी हे दोन दिवसापासून बेपत्ता होते. ते गेल्या दोन दिवसापासून शेतात जाऊन येतो, असे सांगून घरून निघाले होते. मात्र, घरी परतले नव्हते. आज त्यांच्या शेतातील विहिरीजवळून एक जण जात असताना त्यास एक मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. मृतदेह विहिरीतून वर काढला असता तो उमेश पाटील यांचा असल्याचे दिसले. त्यानंतर ही घटना उजेडात आली.
विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल
उमेश चौधरी यांच्यावर 2002 या वर्षांपासून खासगी सावकाराचे कर्ज होते. यावर्षी थकीत कर्जामुळे त्यांना विकास सोसायटीकडून कर्ज मिळाले नसल्याने त्यांनी पुन्हा खासगी कर्ज काढून शेत पेरले. परंतु, पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीसाठी कोण कर्ज देईल, या विवंचनेत ते होते. याच विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्ष व दोन वर्षांची मुले आहेत.