औरंगाबाद- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाळूज परिसरात 9 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. काल रात्री सात पासून परिसर पूर्णतः बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी वाळूजसह आसपासच्या 7 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा बंद पाळण्यात येत आहे. सकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परिसरातील बंदचा आढावा घेतला. नागरिकांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला तर कोरोनावर मात करता येऊ शकते. बंद हा शेवटचा पर्याय जरी नसला तरी यामधून नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. विशेषतः जून महिन्यात रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यामध्ये वाळूज परिसर हॉटस्पॉट ठरला आहे. एका महिन्यात जवळपास 600 हून अधिक रुग्ण परिसरात आढळून आले आहेत. त्यामुळे तातडीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 30 जून रोजी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत वाळूज परिसरात कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आज पासून ही संचारबंदी लावण्यात आली.
वाळूज परिसरात असलेले कारखाने मात्र सुरूच ठेवण्यात आले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे पास आहे आशा लोकांनाच परवानगी देण्यात आली असून इतरांना मात्र औरंगाबादहून वाळूजमध्ये नो एन्ट्री असणार आहे. संचारबंदीच्या या काळात अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये, औषधी दुकान आणि दूध यांचा समावेश आहे त्यांचीच उपलब्धता असणार आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
वाळूज सारखाच निर्णय औरंगाबाद शहरासाठी घेण्यात येण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य केल्यास या आजाराला आपण हरवू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केला.