नागपुर- शहरातील इमामवाडा पोलिसांनी एटीएम मशीन तोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एटीएम मशीन फोडण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य आणि चोरीचे वाहन देखील जप्त केले आहे. रोहित उर्फ काल्या विक्की खोब्रागडे, विशाल उर्फ जट्या कुमरे आणि महेश चुटे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमामवाडा पोलीस ठाणे परिसरातील बैदनाथ चौकात अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. दरम्यान, रोहित उर्फ काल्या विक्की खोब्रागडे, विशाल उर्फ जट्या कुमरे आणि महेश चुटे या तीनही आरोपींनी संगनमत करून एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने आरोपींनी पळ काढला होता.
याबाबत एटीएम मशीनची देखभाल करणाऱ्या कंपनीने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा एटीएम सेंटर बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीनही आरोपी आढळून आले. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला.
पोलिसांनी रोहित उर्फ काल्या विक्की खोब्रागडे, विशाल उर्फ जट्या कुमरे आणि महेश चुटे यांना अटक केली असून आरोपींवर वाहन चोरी, घरफोडी यासह अनेक गुन्ह्यांप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.