नाशिक- दिंडोरी तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढत असून आज पुन्हा 2 कोरोना रुग्ण वाढल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. सर्व रुग्णांचे नाशिक कनेक्शन असल्याने तालुक्यातील कोरोनाचा धोका वाढत चालला असून नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
दिंडोरी तालुक्यात पाहिला रुग्ण 8 मे ला सापडला होता. तो मुंबई येथून आला होता. तेव्हापासून तालुक्यात कोरोना विषाणू रुग्णांची सुरवात झाली. तेथून आज आषाढी एकादशी पर्यत 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. तरी तालुक्यातील पिंपरखेड येथील कोविड सेंटरला 15 पॉझिटिव्ह व नाशिक जिल्हा रुग्णालयात 8 असे एकून 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या पैकी 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगीतले.
तसेच, सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुले, जेष्ठ नागरिक तसेच विविध व्याधी असलेले नागरिक यांना सदर संसर्गाचा अति धोका आहे, तरी सर्वांनी काळजी घ्यावी. सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे, अधीक्षक डॉ. विलास पाटील यांनी केले आहे.