सातारा- पाटण तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तालुक्यात 6 गावातील तब्बल 19 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच, महिंद येथील 92 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 234 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 132 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 90 बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील यांनी दिली.
सध्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतच असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. शनिवारी (25 जुलै) महिंद येथील एका 92 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्यावर कराड नगरपालिकेकडून कोविड निकषांनुसार कराड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पाटण शहरातील चाफोली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुन्या वसतीगृहातही आता इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
विलगीकरण कक्षात वाढ
पाटण पोलिसांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस वसाहतीचे काम पूर्ण झाले असून तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तेथेही 50 व्यक्तींसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. सध्या पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 4, प्रियदर्शनी महिला वसतीगृह 50, मिलिटरी बॉइज होस्टेल 32, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतीगृह 31 व तळमावले कोरोना केअर सेंटर 31, अशा 5 ठिकाणी एकूण 166 व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.