सांगली- जिल्ह्यात आज आणखी 16 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार घेणारे 15 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 131 झाली आहे, तर आता पर्यंत जिल्ह्यात 384 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात आज रात्री पर्यंत 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जत तालुक्यातील बिळूरमधील 6, पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 5 तर ब्रह्मणाळ येथील 2, तासगावमधील 2 आणि बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील 1 अशा 16 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसऱ्या बाजूला उपचार घेणारे 15 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील शिराळा, मणदूर, किनरेवाडी, बिळाशी येथील प्रत्येकी 1 आणि निगडी येथील 2, तर मिरज तालुक्यातील बामणोली, मौजे डिग्रज येथील 2 जण, पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 2 आणि आंधळी येथील 1, तसेच आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथील 1, तासगाव तालुक्यातील मांजर्ड व गव्हाण येथील 2 आणि वाळवा तालुक्यातील वशी येथील 1अशा 15 जणांचा समावेश आहे.
तर आतापर्यंत एकूण 384 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.