परभणी - जिल्ह्यात एप्रिल महिन्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने मे महिन्याच्या सुरुवातीपासून काहीसा दिलासा दिल्याचे चित्र आहे. गेल्या 5 दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शनिवारी 1 हजार 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर नव्या 436 बधितांची नोंद झाली आहे. तसेच मृतांचीही संख्या कमी झाली असून, आज शनिवारी 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
7 हजार 157 रुग्णांवर उपचार -
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होती, आता त्याच प्रमाणात घटतांनाही दिसून येत आहे. आज शनिवारी 436 नवीन बाधित आढळले तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 157 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 15 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 42 हजार 805 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 34 हजार 336 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 61 हजार 800 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 19 हजार 190 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले. तर 42 हजार 805 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1053 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
9 बधितांचा मृत्यू -
दरम्यान, गेल्या 24 तासात 9 बाधितांचा मृत्यू झाला. यात 4 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात 3 तर जिल्हा रुग्णालयाच्याच आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 1 व जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चिरावू व भारत या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात 551 बेड शिल्लक -
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये 1839 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या 551 बेड रिकामे आहेत. यामध्ये रेणुका हॉस्पिटल येथे 169 बेड रिकामे असून, जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 56 बेड तर जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 55, परभणी आयसीयू 2, स्वाती 3, भारत हॉस्पिटल 32, डॉ. प्रफुल पाटील हॉस्पिटल 33, देशमुख 8, अक्षदा मंगल कार्यालय 65, सूर्या 4, प्राईम 14, मोरे 2, सामले 8, सिद्धिविनायक 4, ह्यात 9, सुरवसे मॅटर्निटी 3, पार्वती 10, देहरक्षा 18, स्पर्श हॉस्पिटल 14, पोले 34, गोकुळ हॉस्पिटलमध्ये 7 बेड शिल्लक आहेत. तर 5 हजार 833 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.