परभणी - जिल्ह्यात कालप्रमाणे आज देखील 10 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. या 10 रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 142 एवढी झाली आहे. त्यापैकी 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यपरिस्थितीत 40 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात 6 रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल दिवसभरात 10 रुग्णांची भर पडली, तर आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालांनुसार जिल्ह्यातील 10 संशयित रुग्णांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश झाला आहे. यामध्ये पूर्णा तालुक्यातील महागाव येथील 29 वर्षीय महिला तर परभणी शहरातील महात्मा फुले नगरातील 37 वर्षे पुरुष, जवाहर कॉलनीतील 34 वर्षे पुरुष, करडगाव येथील 21 वर्षीय युवक, वैभव नगरातील 32 वर्षीय पुरुष, गणेश नगरातील 30 वर्षीय महिला, गंगापुत्र कॉलनीतील 59 वर्षीय महिला व 25 आणि 34 वर्षीय पुरुषासह पाथरी शहराच्या एकता नगरातील 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
यातील परभणी शहरात गंगापुत्र कॉलनीत आढळून आलेले 3 कोरोनाबाधित यापूर्वी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आहेत. यापूर्वीदेखील त्या रुग्णाच्या संपर्कातील दोघे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर अन्य भागातील बहुतांश रुग्ण हे नव्याने आढळून आलेले आहेत. या सर्व रुग्णांचा प्रवास इतिहास तपासल्या जात आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाईक आणि मित्र परिवारातील लोकांना शोधण्याचे काम सुरू झाले आहे. त्या सर्वांचे विलगीकरण करून त्यातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन ते नांदेडच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जाणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 967 संशयितांपैकी 2 हजार 638 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आहेत. 88 जणांचे अहवाल हे अनिर्णित असून 47 जणांच्या अहवाल तपासणीची आवश्यकता नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे.
शिवाय 27 अहवाल प्रलंबित होते, हे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले आहेत. त्यातील 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह असून, अन्य रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तर आजच्या 10 रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 142 एवढी झाली आहे. यातील 4 जणांचा या पूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, उर्वरीत 40 बाधितांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.