पुणे- खेड, चाकण, आळंदी व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या 360 च्यावर गेल्याने प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. त्यानुसार, ज्या गावात 5 पेक्षा आधिक रुग्ण असेल त्या शहर व गावात आजपासून पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना आज बैठकीत प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिल्या आहेत.
राजगुरू नगर, चाकण, आळंदी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेड तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय सेवा वगळता कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना संजय तेली यांनी दिल्या. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती अंकुश राक्षे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, चाकण, राजगुरू नगर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून महाळुंगे येथील कोविड सेंटरची क्षमता वाढवून चाकण, राजगुरू नगर येथे कोविड सेंटर तयार करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.