मुंबई - मुंबईत आज कोरोना विषाणूचे नवे 1 हजार 390 रुग्ण आढळून आले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 हजार 253 वर, तर मृतांचा आकडा 5 हजार 464 वर पोहोचला आहे.
मुंबईत आज 1 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 67 हजार 830 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 959 सक्रिय रुग्ण आहेत. आज 62 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 51 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 41 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या.
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा दर 1.34 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 732 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आले आहेत.
तसेच, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 751 इमारतींमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 8 हजार 320 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.