नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मागील अनेक दिवसांपासून पुनरपरिक्षेचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे संतापून कार्यकर्त्यांनी हा पवित्रा घेतला. यामध्ये एका सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण करण्यात आली.
नागपूर विद्यापीठाच्या पुनरपरिक्षांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. त्यानंतर आज अभाविपच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरामध्ये तणावपूर्ण वातारण तयार झाले आहे.
कार्यकर्त्यांनी तोडफोड करताना कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांचे कार्यालयातही गोंधळ घातला. तेथील कार्यालयाच्या काचा त्यांनी फोडल्या असून एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.