नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्धी मिळविण्याकरिता युवक मागेपुढे बघत नाहीत. काहीतरी वेगळं करायचं प्रयत्न करतात. वेगळे काही तरी करण्याच्या प्रयत्नात अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेकदा यामध्ये मुक्या प्राण्यांच्या जीवाची बाजीही लावण्यात आली. अशाच प्रकारचा आणखी एक क्रूर व्हिडीओ समोर आला आहे. एका युट्यूबरने आपल्या पाळीव श्वानाला हायड्रोजन फुग्यांना बांधून उडवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी युट्यूबर गौरव जॉनला अटक केली आहे.
गौरव जॉनचे "गौरव झोन" नावाने युट्यूब चॅनेल आहे. यावर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. पाळीव श्वानाला त्याने हायड्रोजन फुग्यांना बांधून उडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. पाळीव प्राण्याला असे फुग्यांना बांधल्यामुळे काही नेटेकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. हा व्हिडिओ दिल्ली पोलिसापर्यंत पोहचल्यावर गौरवला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला पशू क्रूरता कायद्यांतर्गत अटक केली. त्यानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.
यूट्यूबवर गौरवचे चार मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. व्हिडिओ शूट करताना श्वानाच्या सुरक्षिततेच्या सर्व उपायांची काळजी घेतली होती. सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल मी बोललो होतो. परंतु व्हिडिओच्या लांबीमुळे तो भाग अपलोड केला नाही, असे गौरवने सांगितले. या घटनेबद्दल गौरवने दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपण आपल्या पाळीव प्राण्याबरोबर मुलांसारखे वागत असल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. आरोपी गौरव आणि त्याच्या आईविरुध्द भादंवि कलम 188, 269, 34 अंतर्गथ दिल्लीतील मालवीय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.