आग्रा (उत्तरप्रदेश): छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती प्रथमच आग्रा किल्ल्यावर साजरी होत आहे. महाराष्ट्रातील हजारो महिला, पुरुष, मुलं आणि तरुण या जयंती सोहळ्यासाठी आले आहेत. आग्रा किल्ल्याबाहेर 'जय भवानी' आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरु आहे. आग्रा किल्ल्याच्या बाहेर हजारो लोक गोंधळ घालत आहेत. आग्रा किल्ल्यावर आयोजित जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोकांची पोलिसांशी झटापट झाली. बाचाबाची झाली. प्रवेशासाठी तरुण ढोल-ताशे वाजवत आहेत.
योगी आदित्यनाथ आले नाहीत: महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंती सोहळ्यासाठी ASI कडून परवानगी घेतली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ येणार होते, पण सीएम योगी आले नाहीत. प्रसारमाध्यमांनाही कार्यक्रमाच्या कव्हरेजपासून दूर ठेवण्यात आले आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे म्हणणे आहे की, एएसआयने 800 लोकांच्या प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.
दिवाण- ए- आममध्ये होत आहे कार्यक्रम: महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाउंडेशनला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) फोर्ट दिवाण-ए-आम येथे जयंती कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे पुरंदरच्या तहानंतर आलमगीर औरंगजेबाच्या संदेशावरून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला आले. या दरम्यान औरंगजेबाने त्यांचा विश्वासघात करून त्यांना कैद केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या आग्रा किल्ल्यावरून सुटका झाल्याच्या घटनेला शिव इतिहासात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे यावर्षी आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याची तयारी महाराष्ट्रातील युवकांकडून होत होती. आता महाराष्ट्र सरकारच्या साहाय्याने हा शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे.
२००० जणांसाठी मागितली परवानगी दिली ८०० चीच: आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव आणि सांस्कृतिक संचालक, विकास खारगे यांनी ASI च्या महासंचालक विद्यावती यांच्याकडे परवानगी मागितली होती. परवानगी मागत असताना 18 फेब्रुवारीला रंगीत तालीम आणि 19 फेब्रुवारीला 7 ते 9.30 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती सोहळ्यात 2000 लोक सहभागी होतील असा अंदाज होता. मात्र एएसआयने अवघ्या ८०० लोकांसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बाहेर मोठ्या संख्येने लोकं जमले आहेत.