हैदराबाद - तुमच्या पिढ्या जातील, मात्र हैदराबाद हे हैदराबादच राहील, असा पलटवार एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केला आहे. भाजपाची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू, असे वक्तव्य त्यांनी केले होते. निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगरसाठी आहे. हैदराबादचे नाव बदलले जाऊ नये, असे वाटत असेल, तर मजलिसलाच मतदान करावे, असे आवाहनही ओवैसी यांनी केले.
'याचा मक्ता तुम्ही घेतला का?'
त्यांना नाव बदलायचे आहे. त्यांना सर्वच ठिकाणांच्या नावांमध्ये बदल करायचा आहे. तुमचे नाव बदलले जाईल, मात्र हैदराबाद हे हैदराबादच राहील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येथे येतात आणि म्हणतात आम्ही हैदराबादचे नाव बदलू. याचा मक्ता तुम्ही घेतला आहे का, असा सवाल त्यांनी केला.
'ट्रम्प येण्याचे बाकी'
ही हैदराबादची निवडणूक नसून आपण पंतप्रधान निवडून देत आहोत की काय, असे वाटत आहे. प्रत्येकाला येथे प्रचारासाठी बोलावले जात आहे. आता फक्त ट्रम्प येण्याचे बाकी आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले होते योगी?
उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ काल मलकजगिरीतील प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, की तेलंगाणात भाजपाची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू. उत्तर प्रदेशात आम्ही फैजाबादचे अयोध्या, अलाहाबादचे प्रयागराज केले. त्यामुळे हैदराबादचे भाग्यनगर का नाही होऊ शकत?
१ डिसेंबरला मतदान
१५० जागांच्या हैदराबाद (जीएचएमसी) महानगरपालिकेसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ४ला मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी टीआरएससह एआयएमआयएम, भाजपा, काँग्रेससह टीडीपी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.