हैदराबाद- नवीन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासाठी आणि 2021 (गुडबाय 2021) ला निरोप देण्यासाठी जगभरात जय्यत तयारी केली जात आहे. पण 2022 हे वर्ष अनेक कारणांनी लक्षात राहणारे आहे. हे वर्ष काही गोड आणि काही कटू आठवणी सोबत काही वाईट आणि काही चांगले अनुभव देऊन जात आहे. कधी डोळ्यांमध्ये अश्रू तर कधी अभिमान वाटावा, अशा घटना घडल्या आहे. 2021 मध्ये सर्वात मोठ्या घडलेल्या घटना जाणून घेऊ.
- भारत UNSC चा हंगामी स्थायी सदस्य बनला ( India member of UNSC ) - 1 जानेवारी 2021 रोजी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) हंगामी सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारली. भारताला आठव्यांदा ही जबाबदारी मिळाली आहे. भारताची या पदासाठी दोन वर्षांसाठी म्हणजे 31 डिसेंबर 2022 पर्यंत निवड झाली आहे.
- ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी मालिका ( India won test match in Australia ) -तरुण खेळाडून असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने कांगारूंना त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करत कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याची ही दुसरीच वेळ होती. भारतीय संघाने 2018-19 च्या दौऱ्यावरदेखील ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ झाला होता.
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार ( Violence in Delhi on 26th 2021 ) - 26 जानेवारी 2021 रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढला. यादरम्यान दिल्लीतील रस्त्यांवर प्रचंड गोंधळ झाला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. लाल किल्ल्यावर आंदोलकांकडून झेंडा फडकविताना आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन संकट आणि मृत्यूचे वाढलेले प्रमाण ( corona second wave in India) -2020 मध्ये देशात कोरोनाच्या पहिली लाट आली होती. या लाटेचा आणि लॉकडाऊनचा सामना केल्यानंतर एप्रिल 2021 मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. एका दिवसात ४ लाखांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसऱ्या लाटेत लाखो लोकांसाठी कोरोना जीवघेणा ठरला. या ऑक्सिजन संकटासोबतच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह रांगांमध्ये असलेले भयावह चित्र दिसून आले. कोरोनामुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. देशातील अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा विस्कळित झाल्याचे दिसून आले.
- उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राहिली अस्थिर-2021 हे वर्ष उत्तराखंडमधील अस्थिर राजकीय वातावरणाची आठवण करून देणारे असणार आहे. उत्तराखंडमध्ये 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तीनवेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. 2017 मध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री बनलेल्या त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पौरी गढवालचे लोकसभा खासदार, तीरथसिंग रावत यांना 10 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री करण्यात आले. परंतु त्यांनाही केवळ 116 दिवसांनंतर पायउतार झाले. पुष्कर सिंह धामी यांनी 4 जुलै 2021 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एवढे मुख्यमंत्री बदलल्यानंतर 2022 च्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल, बंगालमध्ये दीदींची हॅटट्रिक- 2021 मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुकचे पुनरागमन झाले. आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपला यश आले. केरळच्या जनतेने पी. विजयन यांच्यावर विश्वास ठेवला. पुद्दुचेरीमध्ये प्रथमच भाजपचे सरकार आले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप 3 जागांवरून 77 जागांवर पोहोचला. पण, ममता बॅनर्जींचा विजय रथ रोखण्यात भाजपला यश मिळाले नाही. ममता बॅनर्जी स्वतः निवडणूक हरल्या आहेत. पण त्यांनी तिसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता आणून विजयाची हॅट्ट्रिक केली.
- मोदी मंत्रिमंडळात सर्वाधिक महिला- 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. त्यानंतर मोदी मंत्रिमंडळात एकूण 78 मंत्री होते. यावेळी 7 महिला मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांची संख्या वाढली आहे. सध्या, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 11 महिला मंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांची संख्या 14.3 टक्के आहे. हे महिला मंत्र्यांचे प्रमाण देशातील आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील 11 महिला मंत्र्यांमध्ये निर्मला सीतारामन, मीनाक्षी लेखी, स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, साध्वी निरंजन ज्योती, शोभा करंदजले, दर्शना जरदोश, अन्नपूर्णा देवी, प्रतिमा भौमिक, डॉ. भारती पवार व अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.
- नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका - 2021 मध्ये देशातील अनेक भागांना नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागला. या वर्षी चक्री वादळांव्यतिरिक्त, पुरानेही अनेक राज्यांना फटका बसला. यावर्षी तौकाटे, यास आणि गुलाब यांसारख्या वादळांमुळे किनारपट्टीवरील राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. याशिवाय दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आणि उत्तर भारतातील उत्तराखंडपासून बिहारपर्यंत पुराचा कहर दिसून आला. यासोबत भूस्खलनामुळे हिमाचल, उत्तराखंड सारख्या डोंगराळ राज्यांतील लोकांना नैसर्गिक संकटांना सामना करावा लागला.
- पेगासस हेरगिरी प्रकरण-इस्रायल कंपनी एनएसओच्या पेगासस सॉफ्टवेअरने देशातील 300 हून अधिक लोकांचे फोन हॅक केल्याचे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्यासह अनेक राजकारणी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी करण्यात आली होती. 2021 च्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी या हेरगिरी घोटाळ्याचा खुलासा झाला होता. विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला होता. हे आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. ज्याचा सरकार साफ इन्कार करत आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती नेमली आहे.
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे बदलले नाव- सन 2021 मध्ये, दरवर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडूंना दिला जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात. या पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले. यावरून राजकारणही तापले होते. 2021 मध्ये 12 खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विविध खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि 10 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- ऑलिम्पिकमध्ये भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी- 2021 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्यपदके जिंकली. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय कुस्तीपटू रवी कुमार दहिया आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिले. बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कांस्यपदक पटकावले. भारतीय हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक यश मिळविले. पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. महिला हॉकी संघ पदक जिंकू शकला नसला तरी त्यांची खेळी ही कौतुकाची बाब ठरली.
- सेन्सेक्सने प्रथमच गाठला 60 हजारांचा टप्पा -2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत यशस्वी ठरले. 2021 मध्येच सेन्सेक्सने प्रथम 50 हजार आणि त्यानंतर 60 हजारांचा आकडा गाठला. 21 जानेवारीला 50 हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सेन्सेक्सने 24 सप्टेंबरला अवघ्या 8 महिन्यांनंतर 60 हजारांचा टप्पा पार केला.
- लखीमपूर खेरी हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट - रविवारी, 3 ऑक्टोबर 2021 रोजी, लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 8 लोक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 4 शेतकरी आणि एक पत्रकार, 3 भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या वाहन चालकाने आंदोलक शेतकर्यांना चिरडले. त्यात 4 शेतकर्यांचा मृत्यू झाल्याचा शेतकरी व विरोधी पक्षांचा आरोप आहेत. यावरून विरोधकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
- टी20 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पहिल्यांदा पराभव -24 ऑक्टोबर रोजी, टी 20 क्रिकेट विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. आजवर 50 षटकांच्या विश्वचषकात भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघावर क्रिकेटप्रेमी नाराज झाले.
- टाटाकडून एअर इंडियाची खरेदी - केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या एअर इंडियाची अखेर ऑक्टोबर 2021 मध्ये विक्री केली. सर्वाधिक बोली लावणारा टाटा समूह हा एअर इंडियाचा मालक आहे. एकप्रकारे, 68 वर्षांनंतर एअर इंडिया ही स्वगृही परतली आहे. टाटा एअरलाइन्सची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. ही कंपनी भारत सरकारने विमान कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करताना ताब्यात घेतली. एअर इंडियाची मालकी घेतल्यानंतर टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी 'वेलकम बॅक, एअर इंडिया' असे ट्विट केले आहे.
- राज कुंद्रा आणि आर्यन खान यांची अटक- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने 2021 मध्ये खूप खळबळ उडवून दिली. तर पॉर्न व्हिडिओ प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या जामिनावर आहेत. पण बॉलीवूडमधील अमली पदार्थांचा वापर आणि अश्लील व्हिडिओ यासारखे अनुचित प्रकरण समोर आले आहेत. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर, एनसीबीने ड्रग्ज घेणाऱ्या बॉलिवूडमधील कारवाया केल्या आहेत. ड्रग्रज प्रकरणात श्रद्धा कपूर आणि कॉमेडियन भारती सिंग यांसारख्या कलाकारांचीही नावे आली आहेत.
- सिनेमासृष्टीने गमाविले तारे - 2021 मध्ये सिनेमासृष्टीतील अनेक तारे निखळले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला (४०), कन्नड सिनेसृष्टीतील स्टार पुनीत राजकुमार (४६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याशिवाय तारक मेहता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे सुरेखा सिक्री (७६) अशा कलाकारांचे निधन झाले.
- केंद्र सरकारने मागे घेतले कृषी कायदे-19 नोव्हेंबर 2021 रोजी, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यावेळी मोदी म्हणाले की, आम्ही शेतकर्यांना कृषी कायद्याचे महत्त्व पटवू देऊ शकलो नाही. आम्ही कायदे मागे घेत आहोत. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
- सीडीएस बिपिन रावत यांचे निधन ( CDS Bipin Rawat death ) - वर्ष सरत असताना तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला . या अपघातात हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचा समावेश होता. तर अपघातात जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा तब्बल आठवडाभरानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिपिन रावत हे देशाचे लष्करप्रमुखही होते.
- विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे लग्न - अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. हे लग्न डिसेंबरमध्ये झाले होते. पण त्याआधीच त्यांचे नाते, साखरपुडा यांच्याबाबत माध्यमांत मोठी चर्चा होती. वर्षभरात त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबाबत चर्चा सुरू होती.
- मिस युनिव्हर्स हरनाज संधू - 13 डिसेंबर 2021 रोजी, मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट भारताच्या हरनाझ संधूने घातला. इस्रायलमधील इलियट येथे झालेल्या ७०व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत हरनाझ संधूने हे यश मिळविले. २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा मुकूट भारताला मिळविला. याआधी सुष्मिता सेन 1994 मध्ये आणि लारा दत्ता 2000 मध्ये मिस युनिव्हर्स झाली होती.