नवी दिल्ली Sahitya Akademi Award 2023 : यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठीमध्ये कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या 'वर्सल' या कथासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला दिला जातो : साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य विश्वात अतिशय मानाचा मानला जातो. देशातील २४ भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांचा या पुरस्काराद्वारे सन्मान केला जातो. सर्व भाषेतील विजेत्यांना १२ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
'मुझे पहचानो' कादंबरीला हिंदी भाषेतील पुरस्कार : साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवास राव यांनी बुधवारी हिंदीसह अन्य भाषांमधील विजेत्यांची नावं जाहीर केली. यावर्षीचा हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार, संजीव यांच्या 'मुझे पहचानो' या कादंबरीला मिळाला आहे. इंग्रजीमध्ये नीलम शरण गौर, तर उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले.
कृष्णात खोत यांची ओळख : कृष्णात खोत यांची ओळख नव्या काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून आहे. त्यांच्या 'रिंगाण' या कादंबरीत, विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी हे कृष्णात खोत यांचं मूळ गाव. त्यांचं प्राथमिक शिक्षण पन्हाळा विद्यामंदिर येथे झालं. गावाकडची संस्कृती आणि खेड्यात होत असलेल्या बदलांमुळे निर्माण होत असलेला संघर्ष हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. खोत यांनी त्यांच्या गावठाण, झडझिंबड, रौंदाळा आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचं वास्तविक चित्रण केलंय. कृष्णात खोत यांना राज्यसरकारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हे वाचलंत का :