बेंगळुरू: जगातील सर्वात मोठ्या योगाथॉनला रविवारी बेंगळुरू येथील कांथीरवा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या योगथॉन कार्यक्रमाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी उद्घाटन केले. क्रीडा आणि रेशीम विभागाचे मंत्री नारायण गौडा, बेंगळुरू शहराचे जिल्हाधिकारी दयानंद यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
योग ही भारतीय संस्कृती आहे : राज्यपालांनी आपल्या भाषणाची सुरुवात उपस्थितांना कन्नडमध्ये अभिवादन करून केली. ते म्हणाले, 'योग ही भारतीय संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही. ही एक प्रक्रिया आहे जी पर्यावरणाशी संवाद साधते. कर्नाटक सरकार योग प्रशिक्षण शाळा उघडून योगास प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करत आहे. आपल्या संस्कृतीत तरुणांनी योगा, व्यायाम यासारखे उपक्रम अंगीकारले पाहिजेत. आजच्या कार्यक्रमातून जे गिनीज रेकॉर्ड करणार आहेत त्या सर्वांना शुभेच्छा'.
धारवाडमध्ये कौन्सिल स्पीकरने केले उद्घाटन : कौन्सिल स्पीकर बसवराज होरत्ती यांनी धारवाडमध्ये योगाथॉन गिनीज रेकॉर्ड स्पर्धेचे उद्घाटन केले. धारवाड शहरातील आर.एन.शेट्टी स्टेडियमसह तीन ठिकाणी योगथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध राज्यातील हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
शिवमोग्गा येथे खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन : शिवमोग्गा येथील नेहरू स्टेडियम येथे जिल्हा प्रशासन, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगथॉन कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार बी. वाय. राघवेंद्र यांनी केला. या कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी डॉ.सेल्वामणी, जिल्हा पोलीस अधीक्षक मिथुन कुमार, माजी सुडा अध्यक्ष ज्योती प्रकाश यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
विजयपुरा येथील योगाथॉन : जिल्हा प्रशासन, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या वतीने शहरातील सैनिक शाळेच्या मैदानावर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त योगाथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह २५ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. सैनिक शाळेच्या मैदानात योगासनासाठी एकूण 9 ब्लॉक करण्यात आले. प्रत्येक ब्लॉकमध्ये सुमारे 2 हजार योगींनी योगासने केली. योग पटू बसनागौडा होराना यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार रमेश जिगाजीनागी यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले, 'योग हे शरीराचे आरोग्य राखण्यासाठी पूरक आहे. केंद्रातील आधीच्या सरकारांनी याची काळजी केली नाही. मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी योग दिन साजरा करण्यासाठी जागतिक संघटनेकडे प्रस्ताव सादर केला आणि आता संपूर्ण जग योग दिन साजरा करत आहे ही अभिमानाची बाब आहे.
एकाच वेळी 35 ठिकाणी आयोजन : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी 35 ठिकाणी योगाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील १० लाखांहून अधिक लोकांच्या सहभागासह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य आणि केंद्रीय क्रीडा आणि युवा सक्षमीकरण विभाग आणि आयुष आणि संस्कृतीचे केंद्रीय विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत आणि कर्नाटक योग क्रीडा संघटनांनी केले होते.