नवी दिल्ली - देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय पुढील दोन आठवडे व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी घेणार आहे. 3 जानेवारीपासून व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणीस सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने रविवारी संध्याकाळी एक परिपत्रक जारी करून हा निर्णय जाहीर केला.
हेही वाचा - Saamna Rokthok : भाजपच्या प्रवासाचा आलेख 2022 मध्ये खाली आलेला दिसेल
आधी प्रत्यक्ष सुनावणीसाठी ( physical hearing ) एसओपी सांगणारे जे परिपत्रक काढण्यात आले होते ते काही काळासाठी निलंबित राहील, असे निर्णयात सांगण्यात आले आहे. प्रत्यक्ष सुनावणीसाठी 7 ऑक्टोबरला अधिसूचित करण्यात आलेली सुधारित मानक कार्यप्रणाली (SOP) ही सध्यासाठी निलंबित राहील. दोन आठवड्यांसाठी न्यायालयातील सर्व सुनावण्या या व्हर्च्युअल पद्धतीने होतील. त्याची सुरुवात 3 जानेवारीपासून होईल, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुरू होणार
हिवाळ्याच्या सुट्ट्यांनतर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुरू होणार आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक एसओपी जारी केला होता, ज्यामध्ये अशी प्रकरणे ज्यांची लांबलचक सुनावणी गरजेची आहे ती बुधवारी आणि गुरुवारी प्रत्यक्ष सुनावणीसाठी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सोमवार आणि शुक्रवारी गर्दी टाळण्यासाठी, प्रकरणांची सुनावणी केवळ व्हर्च्युअल पद्धतीनेच केली जात होती. केवळ मंगळवारी सुनावणी हायब्रिडमोडमध्ये होत होती.
सर्वोच्च न्यायालय मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणांची सुनावणी करत आहे. मात्र, 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनेक बार बॉडीज आणि वकिलांनी प्रत्यक्ष सुनावणी ताबडतोब पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केल्यानंतर एसओपी जारी करण्यात आला. कारण त्यावेळी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती.
हेही वाचा - Sant Kalicharan Troubles Increased : कालिचरण महाराजांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक रायपूरमध्ये