कोलकाता : भाजपा कार्यकर्ते मजुमदार यांच्या आईच्या निधनाबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. शोभा मजुमदार यांना मागील महिन्यात काही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला. तर यावर, ममतांनी 'हाथरसच्या घटनेवेळी शाह गप्प का होते?' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
"शोभा यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. महिलांवरील हिंसाचाराच्या आपण कायमच विरोधात आहे. मात्र, भाजपा शासित उत्तर प्रदेशात जेव्हा एखाद्या महिलेचा छळ करुन हत्या केली गेली, तेव्हा अमित शाह का गप्प बसले होते?" अशा सवाल ममतांनी उपस्थित केला आहे.
तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांचीही हत्या..
भाजपा या घटनेचे राजकारण करत असून, बंगालची काय परिस्थिती आहे अशा आशयाचे ट्विट अमित शाहांनी केले आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये महिलांवरील अत्याचारानंतर असे काही ट्विट त्यांनी केले नव्हते. तसेच, गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे, असेही ममता यावेळी म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
भाजपा कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांनी मागील महिन्यात असा आरोप केला होता, की तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या घरात घुसून आपल्याला आणि आपल्या आईला मारहाण केली. याबाबत त्यांच्या आई शोभा यांनीही असेच आरोप केले होते. त्यानंतर आज (सोमवार) पहाटे शोभा यांचे निधन झाले. यावर "तृणमूलच्या गुंडांनी ज्यांना मारहाण केली होतीस अशा शोभा मजुमदार यांच्या निधनाने मी संतापलो आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ही घटना कायम लक्षात ठेवावी लागेल", अशा आशयाचे ट्विट शाहांनी केले होते.
हेही वाचा : बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप