नवी दिल्ली : भारताने आपला काही भूभाग चीनला दिल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे चीनला घाबरले असून, ते आपल्या सैन्याचे बलिदान व्यर्थ घालवत आहेत असेही राहुल यावेळी म्हणाले.
राहुल म्हणाले, की काल संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत पूर्व-लडाखबाबत काही वक्तव्य केले. आता आम्हाला कळत आहे, की फिंगर ३ या ठिकाणी आपले सैन्य तैनात करण्यात आले आहे. तेथील फिंगर ४ हा भाग भारताचा भूभाग आहे. मात्र, तरीही आपले सैनिक फिंगर ४ वरुन फिंगर ३ वर आणण्यात आले आहेत. आपला हा भूभाग मोदींनी चीनला का दान केला आहे?
देपसंग मैदानाबाबत काही वक्तव्य का नाही?
संरक्षण मंत्र्यांनी बोलताना देपसंग मैदानाबाबत काहीही माहिती दिली नाही. याठिकाणाहूनच चीनने भारतात घुसखोरी केली असताना याबाबत बोलणे का टाळण्यात आले? कारण पंतप्रधानांनी तो भूभाग चीनला देऊन टाकला आहे. याबाबत त्यांनी देशासमोर खुलासा करावा, असे गांधी म्हणाले.
पंतप्रधान भित्रे; चीनसमोर उभे राहण्यास घाबरतात..
आपले पंतप्रधान भित्रे आहेत, ते चीनच्या समोर उभे ठाकण्यास घाबरतात. एवढेच नाही, तर चीनसमोर उभे ठाकणाऱ्या आपल्या जवानांच्या बलिदानाचाही ते विश्वासघात करत आहेत. ते आपल्या सैन्याच्या बलिदानावर अक्षरशः थुंकत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.