नवी दिल्ली - कोव्हॅक्सिन घेऊनही चिंतेत असलेल्या नागरिकांकरिता दिलासादायक बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनला ४ ते ६ आठवड्यात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सीएसईच्या वेबिनारमध्ये शुक्रवारी दिली आहे.
कोव्हॅक्सिनने संपूर्ण डाटा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ता याची माहिती दिली आहे. यापूर्वीच भारत बायोटेकने डाटा दिला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीबाबत ४ ते ६ आठवड्यामध्ये निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. सध्याच्या घडीला जागतिक आरोग्य संघटनेने फायझर, अॅस्ट्राझेनेका सीरम, अॅस्ट्राझेनेका ईयू, जानसी, मॉर्डना आणि सिनोफार्म या लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
हेही वाचा-भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी
डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण मिळविण्याकरिता दोन डोस गरजेचे-
डेल्टा व्हेरियंट हा अत्यंत संसर्गजन्य आहे. डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण मिळविण्यासाठी लशीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. मात्र, तरीही संसर्ग होण्याची व संसर्ग पसरविण्याची शक्यता असते. याच कारणामुळे मास्क घालण्यासह इतर काळजी घेणे सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. काही कंपन्या दोन डोसनंतर बुस्टर डोस विकसित करणार आहेत. त्याबाबत बोलताना सौम्या म्हणाल्या, की बुस्टर डोसची गरज असल्याबाबतची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही.
हेही वाचा-कोरोनाशी लढा... ब्राझीलकडून कोव्हॅक्सिनच्या आयातीला परवानगी
कोरोना लसीमुळे १२ महिन्यापर्यंत प्रतिकारक्षमता-
पुढे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ स्वामीनाथन म्हणाल्या, की विज्ञान अजूनही प्रगती करत आहे. प्रत्येकाला बुस्टर डोस लागेल, अशी माहिती दाखविणारी आकडेवारी सद्यस्थितीला उपलब्ध नाही. लसीकरण झालेल्या लोकांच्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रेरक आहेत. कोरोना लसीमुळे ८ ते १० महिने किंवा १२ महिन्यापर्यंत प्रतिकारक्षमता शरीरात राहत असल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा-भारत बायोटक संचालकांचे चंद्रपूरशी खास नाते, आनंदवनाला पुरवणार 4 हजार 'कोव्हॅक्सिन'
कोव्हॅक्सिन डेल्टावर ६५ टक्के प्रभावी!
दरम्यान, कोव्हॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीचे निष्कर्ष आणि विश्लेषणविषक माहिती भारत बायोटेकने जाहीर केली आहेत. यात त्यांनी कोरोनाच्या सामान्य लक्षणांवर ही लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले. तर कोरोनाच्या डेल्टा या नव्या स्वरुपावर ६५ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.