जयपूर Rajasthan CM : भारतीय जनता पार्टीनं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांची घोषणा केली. मात्र राजस्थानबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. दोन राज्यांमध्ये पक्षाच्या मुख्यमंत्री पदाची निवड अनपेक्षित होती. त्यामुळे आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मंगळवारी विधिमंडळ पक्षाची बैठक : राजस्थानमध्ये मंगळवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेच्या खासदार सरोज पांडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश आहे. हे तिघंही या बैठकीला उपस्थित राहतील. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस भजनलाल शर्मा यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना बैठकीला सक्तीनं उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी ४ वाजता ही बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री पदासाठी ही नावं चर्चेत : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र यादव, ओम माथूर, अश्विनी वैष्णव, किरोरी लाल मीणा हे प्रमुख नेते सध्या शर्यतीत आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. या प्रस्तावानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.
वसुंधरा राजे यांच्या निवासस्थानी हालचाल वाढली : माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जयपूरमधील बंगल्यावर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत. येथे मोठ्या संख्येनं आमदार आणि इतर नेत्यांचं आगमन सुरू आहे. राजे रविवारी सकाळी दिल्लीहून परतल्यानंतर जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अनेक नवनिर्वाचित आमदार त्यांच्या निवासस्थानी पोहचले. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक पर्नामी, माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत आणि माजी मंत्री देवीसिंह भाटी यांनीही वसुंधरा राजे यांची भेट घेतली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वसुंधरा राजे यांच्या निवासस्थानी आमदारांच्या अशा मेळाव्याकडे त्यांच्यामार्फत वापरण्यात येणाऱ्या दबावतंत्राचा भाग म्हणून पाहिलं जात आहे.
हे वाचलंत का :