जयपूर Bhajan lal Sharma : भारतीय जनता पार्टीनं राजस्थानमध्ये नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. पक्षानं यावेळी ब्राह्मण चेहऱ्यावर विश्वास दाखवला. जयपूरच्या सांगानेर येथून आमदार भजन लाल शर्मा राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत.
प्रथमच उमेदवारी मिळाली : भरतपूर येथील रहिवासी भजन लाल शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी चार वेळा प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिलंय. संघटनेतील कामाचं बक्षीस म्हणून त्यांना राज्याचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं. भजन लाल शर्मा यांना या विधानसभा निवडणुकीत प्रथमच सांगानेर सीटवरून उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी येथून काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी दणदणीत पराभव करत मोठा विजय नोंदवला.
संघाच्या जवळचे मानले जातात : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षानं भरतपूरचे रहिवासी भजन लाल शर्मा हे बाहेरचे असल्याचा आरोप केला होता. सांगानेरच्या जनतेनं बाहेरच्या उमेदवाराला मतदान न करण्याचं अपील पक्षानं केलं होतं. मात्र, असं असतानाही या जागेवरून शर्मा यांनी मोठा विजय नोंदवला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा संघटनेच्या जवळचे मानले जातात.
पदव्युत्तर पदवीधर आहेत : भजन लाल शर्मा हे राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. १९९३ मध्ये त्यांनी राजकारणात एम.ए.ची पदवी मिळवली. त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत दोन खटले प्रलंबित आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याशिवाय दुसरा खटला भारतीय दंड संहितेच्या कलम १४९ अंतर्गत नोंदवला गेला आहे.
भजन लाल शर्मा यांची संपत्ती : भजन लाल शर्मा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर, ते करोडपती आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १.४० कोटी रुपये आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशानुसार, भजन लाल शर्मा यांच्या एकूण संपत्तीपैकी १,१५,००० रुपये रोख आहेत. तर त्यांच्याकडे सुमारे ११ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्याकडे तीन तोळं सोनं असून त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. त्यांच्याकडे LIC आणि HDFC लाइफच्या दोन विमा पॉलिसी आहेत. राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर टाटा सफारी कार आहे. याशिवाय त्यांच्या नावावर एक TVS Victor मोटरसायकलही आहे.
हे वाचलंत का :