जिनिव्हा - फायजर आणि बायोएनटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे. आणीबाणीच्या काळातील वापरासाठी ही लस आता गरीब देशांना उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेत या लसीला आधीपासूनच परवानगी मिळाली असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटना गरीब आणि विकसनशील देशांत लसीकरण करण्याची मोठी मदत करते. त्यामुळे या देशांसाठी ही चांगली बातमी आहे.
लसीकरण प्रक्रिया जलद व्हावी म्हणून परवानगी-
ज्या देशांमध्ये औषध नियामक कार्यालय आहे, त्यांचीही कोरोना लस वापरासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असते. मात्र, काही गरीब देशांमध्ये औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे असे देश जागितक आरोग्य संघटनेवर अवलंबून असतात. ज्या देशांमध्ये औषध नियामक कार्यालये आहे, त्यांची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया जलद व्हावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लसीला परवानगी दिली आहे.
फायजरची लस कार्यक्षम -
फायजर आणि बायोएनटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटना, युरोपीयन संघटना आणि इतरही अनेक देशांनी परवानगी दिली आहे. ही लस सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे निकष पूर्ण करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. फायजर कंपनीने तयार केलेली लस उणे ८० अंश सेल्सिअल तापमानात साठवून ठेवावी लागते. त्यामुळे विकसनशील देश आणि गरीब देशांना लसीची साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे ज्या देशात शीतगृहांची उपलब्धता कमी आहे, किंवा नाही अशा देशांना लसीकरण करण्यात मोठे आव्हान असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.