लखनऊ Lucknow Plane Returned to Delhi : दिल्लीहून येणाऱ्या विमानाला गर्दीच्या तासांमध्ये लखनऊ विमानतळावर उतरण्याचा सिग्नल मिळाला नाही. तसंच वैमानिकाला काही वेळ हवेत घिरट्या घालण्यास सांगण्यात आलं. यादरम्यान विमानातील इंधन झपाट्यानं कमी होऊ लागलं. यामुळं वैमानिकानं समयसूचकता दाखवत विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेनं वळवलं. नंतर हे विमान संध्याकाळी लखनऊला परतलं. यामुळं मंगळवारी लखनऊ विमानतळावर गोंधळाचं वातावरण होतं.
इंधन नसल्यानं विमान दिल्लीला परतलं : विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर एशियाचं फ्लाइट लखनऊ विमानतळावर 45 मिनिटे चक्कर मारुन दिल्लीला परतलं. नंतर हे विमान संध्याकाळी लखनऊ विमानतळावर उतरलं. यामुळं त्यात बसलेले प्रवासी मात्र काही तास चिंतेत राहिले. एअर एशियाचं फ्लाइट क्रमांक I5738 मंगळवारी दुपारी 1 वाजता दिल्लीहून निघालं होतं. दुपारी 1.45 च्या सुमारास फ्लाइट लखनऊला पोहोचलं. ही गर्दीची वेळ असल्यानं त्यावेळी विमानांची संख्या खूप जास्त होती. या कारणास्तव, हवाई वाहतूक नियंत्रणानं पायलटला आणखी काही वेळ हवेत प्रदक्षिणा घालण्यास सांगितलं जेणेकरुन धावपट्टी मोकळी करता येईल. दरम्यान, यामुळं विमानाचं इंधन कमी होऊ लागलं. यानंतर पायलटनं समयसूचकता दाखवत ATC ला कळवलं आणि दिल्लीला जाण्याचा मार्ग विचारला आणि विमान 2:20 च्या सुमारास पुन्हा दिल्लीला परतलं. नंतर हे विमान लखनऊ विमानतळावर सायंकाळी 5.30 वाजता पोहोचलं.
लखनऊला येणारं विमान पोहोचलं झारखंडला : तसंच सकाळी इंडिगो एअरलाइन्सचं फ्लाइट क्रमांक 6E453 जे सकाळी 8.00 वाजता हैदराबादहून लखनईला येणार होतं. मात्र, लखनऊ विमानतळावरील खराब हवामानामुळं हे विमान प्रदक्षिणा करुन झारखंडला पोहोचलं. हे विमान सकाळी 8.45 वाजता झारखंडमधील रांची विमानतळावर उतरलं.
खराब हवामानाचा परिणाम : खराब हवामान आणि धावपट्टीचा विस्तार न झाल्यानं खराब हवामानाचा परिणाम विमान कंपन्यांवर होऊ लागला आहे. खराब हवामानाचा सामना करण्यासाठी विमानतळ प्रशासनानं सर्व तांत्रिक व्यवस्था सुधरवण्याचं सांगितलं होतं. अशातच आता धुकं सुरु झालंय. यामुळं अनेक विमानं त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं उड्डाण करत असून अनेक विमानं वळवण्यात आल्याचंही समोर आलंय. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ विमानतळावर विमानांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र धावपट्टीचा विस्तार न झाल्यामुळं विमान चालवण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
हेही वाचा :