नवी दिल्ली - गुढी पाडव्यानिमित्त नवे हिंदुवर्ष सुरू होताना दुसरीकडे देशभरात कोरोनाची चिंता भेडसावत आहे. म्हाडा सोडत काढणार असल्याने हजारो जणांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. अशा महत्त्वाच्या देशभरात महत्त्वाच्या ठरणाऱ्या घडामोडी जाणून घेऊ.
१. रिअलमीच्या नव्या स्मार्टफोनचा खास सेल
नवी दिल्ली - रिअलमी सी२०, सी२१ आणि सी२५ स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. या स्मार्टफोनचा पहिला सेल आज होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ६ हजार ९९९ रुपयांपासून पुढे आहे.
२. म्हाडाच्या २८९० घरांची होणार सोडत
मुंबई- पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्यावतीने (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ८९० घरांची ऑनलाइन सोडत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. या सोडतीचा प्रारंभ १३ एप्रिलला सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
३. गुढी पाडव्यानिमित्त नागपूरमध्ये सर्व चाचणी केंद्र राहणार बंद
नागपूर- कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्याला उशीर होत आहे. अशा स्थितीत काही तांत्रिक अडचणीमुळे १२ एप्रिल व १३ एप्रिलला सर्व शासकीय चाचणी केंद्रावरून केवळ रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू ठेवण्यात येणार आहे. तर गुढी पाडव्यानिमित्त सर्व चाचणी केंद्र बंद राहणार आहेत.
४. देशात आजपासून सलग ४ दिवस बँका बंद
मुंबई- आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९ दिवस बँका बंद असणार आहेत आहेत. तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त १३ एप्रिलला बँकेला सुट्टी असणार आहे. तर दुसर्या दिवशी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिलला हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष अशा कारणांनी काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.
५. नवरात्राला प्रारंभ
मुंबई- चैत्र नवरात्रीची सुरुवात आज होणार आहे. तर २२ एप्रिलला नवरात्री समाप्त होणार आहे. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ स्वरुपांची विधीवत पूजा केली जाते.
६. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस
मुंबई- महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो.
७ अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी व्हावे लागेल हजर
मुंबई - तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
८. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार राज्याभिषेक सोहळा!
मुंबई-साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी नव्या संकल्पांचा आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ होतो.
९. गुढी पाडव्यानिमित्त अॅमेझॉनवर ग्राहकांसांठी स्पेशल ऑफर
मुंबई - अॅमेझॉनने दरवर्षीप्रमाणे सणासुदीनिमित्त खरेदीसाठी आज स्पेशल ऑफर आणल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तुंसह कपड्यांच्या खरेदीवर मोठ्या सवलती दिल्या जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
१० - केकेआरविरोधात मुंबई इंडियन्सचा रंगणार सामना
मुंबई - चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला या आयपीएल सामन्यामध्ये आरसीबीने हरविले होते. सलग दोनवेळा जिंकणारी मुंबई इंडियन्स आता केकेआरच्या विरोधात आज मैदानात उतरणार आहे.