गोंडा (उत्तर प्रदेश) : लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी आपण सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार सिंह यांच्यावर दिल्लीत २ गुन्हे दाखल केले आहेत. पॉक्सो कायद्याचे कलमही त्यांना लावण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घेतली स्वत:हून दखल : लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील आघाडीच्या महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर पुन्हा एकदा आघाडी उघडली आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला अनेक नेते व संघटनांचे सहकार्य मिळत आहे. हे कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांना बडतर्फ करण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.
'मी न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा नाही' : भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह गोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण खूप खूश आहोत. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. तपासात माझे सहकार्य आवश्यक असेल तेथे मी सहकार्य करण्यास तयार आहे. या देशात न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा कोणी नाही. मीही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. एफआयआर लिहिण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले असले तरी या निर्णयाचे मी स्वागत करतो', असे ते म्हणाले.
'मी कोणावरही अन्याय केलेला नाही' : ज्या वेळेस ओव्हर साईट कमिटी स्थापन झाली त्या वेळेस देखील मी काही प्रश्न उपस्थित केला नाही, या वेळीही मी कोणताही प्रश्न उपस्थित करत नाही, असे ते यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी सर्व नियम आणि कायदे पाळले होते आणि या लोकांनी थोडी वाट पाहायला हवी होती. माझा स्वत:वर विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले. माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे. मी कोणावरही अन्याय केलेला नाही, तेव्हा मला न्याय मिळेल, असे ब्रिजभूषण शरण सिंह शेवटी म्हणाले.
हेही वाचा : WFI Controversy : दिल्ली पोलीस ब्रिजभूषण सिंह विरोधात FIR नोंदवणार, सुप्रीम कोर्टात दिली माहिती