कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सातव्या टप्प्यात 34 जागांसाठी हे मतदान आहे. यासाठी एकूण 284 उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात 86 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी सांगितले की, मतदानादरम्यान सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय बलाच्या 796 हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर मतदानादरम्यान, कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
12,068 मतदान केंद्र -
सातव्या टप्प्यासाठी 12068 मतदान केंद्र आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपुरचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदार संघावर असणार आहे. याठिकाणी तृणमूल कॉंग्रेसकडून ऊर्जामंत्री सोभनदेब चट्टोपाध्याय हे निवडणूक लढवत आहेत. कारण, ममता बॅनर्जी यांनी यावेळी नंदीग्राम येथून निवडणूक लढवली आहे. तर भाजपने भवानीपूर येथून अभिनेता रुद्रनील घोष यांना उमेदवारी दिली आहे.