उत्तर २४ परगणा (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी एका बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात आत्तापर्यंत किमान ६ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये फटाका कारखान्यात काम करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी सर्वत्र मृतदेह विखुरले : उत्तर परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर भागात ही घटना घडली. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, कारखान्यात उपस्थित असलेल्या अनेकांचे अक्षरश: तुकडे झाले. स्फोटानंतर घटनास्थळी सर्वत्र मृतदेह विखुरलेले होते. यातूनचा या घटनेच्या तीव्रतेचा अंदाज येतो. स्थानिकांनी सांगितले की, भीषण स्फोटानंतर घरांच्या छतावर आणि झाडांवर काही मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
स्फोटामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट : या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. स्थानिकांनी आरोप केलाय की, हा बेकादेशीर फटाका कारखाना बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका स्थानिक व्यक्तीनं सांगितले की, त्याने सर्वत्र रक्ताने माखलेले अनेक मृतदेह पाहिले. तसेच त्याने घटनास्थळी एका महिलेला आणि तिच्या मुलाला वाचवलं. स्फोटानंतर ती महिला घरात अडकून पडली होती.
या आधीही झाला होता असा स्फोट : या आधी मे महिन्यात मिदनापूरच्या एग्रा येथे असाच एक स्फोट झाला होता. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटाचा प्रभाव इतका भीषण होता की, त्यामुळे एका निवासी इमारतीत सुरू असलेला कारखाना कोसळला होता. बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्याचे मालक कृष्णपद बाग उर्फ भानू बाग यांचा ओडिशातील कटक येथे रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा :