कोलकाता - पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद निवळताना दिसून येत नाही. केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांची बदली केली आहे. त्यांना 31 मेला नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने अलप्पन बंदोपाध्याय यांना अद्याप कार्यमुक्त केले नसून ते उद्या दिल्लीला जाणार नसल्याची माहिती आहे. परिणामी केंद्र आणि राज्य सरकारमधील तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अलापन बंड्योपाध्याय उद्या दुपारी नबन्ना येथे सचिव-स्तरीय बैठकीलाही हजर राहू शकतात. चक्रीवादळ 'यास' संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या सर्व सचिवांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून या आढावा बैठकीत अलापन बंद्योपाध्याय उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.
बदली रोखण्याची ममतांची केंद्राला विनंती -
'यास' चक्रीवादळाचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिरा पोहचल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांच्या बदलीचे निर्देश दिले. बंदोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या अधिकऱ्यांपैकी एक असल्याचे बोलले जाते. बंदोपाध्याय यांना 31 मे रोजी नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने त्यांना बदलीचे पत्र दिले आहे. दरम्यान, बंदोपाध्याय यांचा कार्यकाळ 31 मेला संपणार होता आणि ते निवृत्ती घेणार होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच तीन महिन्यांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत बंदोपाध्याय यांची बदली रोखण्याची विनंती केंद्राला केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने आपला आदेश मागे न घेतल्यास बंगाल सरकार त्या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊ शकते.
यापूर्वीचा अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वाद -
पश्चिम बंगालमधील २४ परगाना जिल्ह्यातील डायमंड हार्बर येथे जात असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर १० डिसेंबरला (गुरुवार) दगडफेक झाली होती. त्यावर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप भाजपाने केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगालमध्ये कार्यरत असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना माघारी केंद्रात बोलावले होते. परंतु ममतांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केलेच, तर त्या अधिकाऱ्यांना बढतीही दिली. सध्या ते अधिकारी विविध पदांवर तैनात आहेत. आयपीएस अधिकारी भोलानाथ पांडे, आयपीएस अधिकारी प्रवीण त्रिपाठी आयपीएस राजीव मिश्रा यांचा समावेश आहे.