पाटणा - ग्रामस्थाच्या प्रसंगावधानाने बिहारच्या कैमूरमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला असून शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत. पंडित दीन दयाल उपाध्याय आणि गया रेल्वेखंडदरम्यानच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे दिसताच एका शेतकऱ्याने आपले लाल उपरणे दाखवून रेल्वेला धोक्याचा इशारा दिला. हे पाहताच मोटरमॅने गाडी थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली.
तर झाले असे, की शेतकरी प्रेम चंदराम हे रूळाच्या कडेकडेने जात होते. तेव्हा त्यांची नजर तडा गेलेल्या रेल्वे रुळावर गेली. तुटलेल्या रुळावरून गाडी गेल्याने गाडीचा अपघात होऊ शकतो, याचे गांभीर्य त्यांनी ओळखले. परंतु रेल्वे स्टेशनला फोन करून माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे त्यावेळी मोबाइल नव्हता. तेव्हा ते स्थानकाच्या दिशेने निघाले. मात्र, थोड्यावेळातच त्यांना बीकानेर एक्सप्रेस येताना दिसली. तेव्हा थोडे गोंधळले, मात्र, लगेचच त्यांनी आपल्या गळ्यातील लाल उपरणे फडकवून रेल्वेला धोक्याचा इशारा दिला. लाल निशाण दिसताच चालकाने आत्पकालीन ब्रेक लावून गाडी थांबवली.
पुसैली रेल्वे स्थनाकापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या गाडीतून हजारो प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर रेल्वे मार्ग दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शेतकऱ्याने दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.