लखनऊ - उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी सध्या चर्चेत आहेत. इस्लामचे पवित्र पुस्तक म्हणजे कुराण वाचल्याने मुस्लिम तरूण दहशतवादी होत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ऐवढेच नाही. तर त्यांनी नवे कुराण तयार केले आहे. त्याची पहिली प्रत सोमवारी छापण्यात आली आहे. ही पहिली प्रत ते देशातील मुस्लिमांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मौलाना रबे हसानी नदवी यांना पाठवण्यात येणार असल्याचे रिझवी यांनी सांगितले.
वसीम रिझवी यांनी सोमवारी व्हिडीओ जारी करून संदेश दिला की, त्यांनी लिहिलेली कुराण हे खरे आहे. जुन्या कुराणातील 26 श्लोक काढून नवीन क्रमाने श्लोक जोडून हे कुराण तयार केले आहे. हे कुराण अहले बैत आणि हजरत अली यांच्यासह रसूलच्या कुटुंबावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्लाम हा प्रेमाचा धर्म...
जगात दहशतवाद वाढत आहे. कुराण नीट वाचले नाही. तर दहशतवाद कधीही थांबणार नाही. कारण मुसलमान कुराण वाचून दहशतवादी होत आहे. त्यामुळे नवं वास्तविक कुराण वाचले पाहिजे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या श्लोकांना बाहेर काढून टाकलं पाहिजे. इस्लाम हा प्रेमाचा धर्म असून अत्याचार व अतिरेकी नाही, असे वसीम रिझवी म्हणाले.
कुराणातील 26 आयत हटवण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी -
यापूर्वी वसीम रिझवी यांनी कुराणमधील 26 आयत हटवण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 12 एप्रिलला ती याचिका फेटाळली होती. कुराणच्या 26 आयतामुळे (श्लोक) दहशतवादाला चालना मिळते. इस्लाम हा समानता, चांगुलपणा, क्षमा आणि सहनशीलता या संकल्पनेवर आधारित आहे. परंतु कुराणच्या 26 आयातामुळे धर्म मूलभूत तत्त्वांपासून दूर जात आहे, असा युक्तीवाद रिझवी यांनी आपल्या याचिकेत केला होता. कुराणावर आक्षेप घेतल्याप्रकरणी मुस्लीम समाजातील नेत्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलने केली होती.